Maharashtra election 2024 – उमेदवारीसाठी मुंबई वाऱ्या; काँग्रेस इच्छुक दिल्लीकडे

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून, गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात मुंबई वाऱ्या सुरू आहेत. जागावाटप आणि उमेदवारीबद्दल अनेक इच्छुक संभ्रमात असून, शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या भेटीगाठींसाठी जोर-बैठका सुरू आहेत. तर, काँग्रेस इच्छुकांचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

भाजपने शहर आणि जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या विद्यमान आमदारांनी काल रात्रीच मुंबई गाठली. महायुतीत जागांची अदलाबदल होणार असल्याच्या धास्तीमुळे भीमराव तापकीर, सुनील कांबळे यांचा जीव टांगणीला लागला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गटातील इच्छुकांमध्ये ग्रामीण मतदारसंघांमधील उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. खेड, जुन्नर, वडगाव शेरी, पुरंदरमधील इच्छुकांनी मुंबईत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा निर्णय दिल्लीत होत असल्याने शहर आणि जिल्ह्यातील काही इच्छाकांनी दिल्लीत जाऊन ‘फिल्डिंग’ लावली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अद्यापि जाहीर झालेले नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघांत इच्छुक संभ्रमात आहेत. काही मतदारसंघांमध्ये पक्षप्रवेश होत असल्याने संभ्रमात अधिकच भर पडत आहे.

बंडखोरीची शक्यता लक्षात घेता, काही मतदारसंघांतील उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करण्याची खेळी पक्षांच्या नेत्यांकडून होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज भरून ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीची शक्यता आहे. तीर्थयात्रा, साडीवाटप, त्याचबरोबर ‘होम मिनिस्टर’ आदी कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या परिस्थितीत उमेदवारी न मिळाल्यास हे इच्छुक बंडखोरीसाठी दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत.

पर्यायी पक्षाच्या शोधात

महाविकास आघाडी किंवा महायुतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळलेले अनेक इच्छुक अन्य राजकीय पक्षांचा पर्याय शोधत आहेत. परिवर्तन महाशक्ती, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. या पक्षांनीदेखील इच्छुकांना आपली दारे खुली ठेवून उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आहे.