यूटय़ूबर्स आणि रिल स्टार बनले स्टार प्रचारक; उमेदवारांचा डिजिटल प्रचारावर भर, निवडणूक प्रचारात मागणी वाढली

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीसह सोशल मीडियावरून प्रचारास जोर दिला आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या रिल स्टार आणि यूटय़ुबर्सना मागणी वाढलेय. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेटकऱ्यांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होतेय. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी पारंपरिक प्रचारासोबतच डिजिटल साधनांचा वापर करण्यात येत आहे. प्रचाराचा झंझावात सोशल मीडियावर दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, यूटय़ुब, एक्सवर प्रचार वाढला आहे. त्यातही सोशल मीडियावर चांगले फॉलोअर्स असणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांच्या पेजला मोठय़ा प्रमाणात जाहिराती मिळत आहेत. जितका सोशल मीडिया स्टारचा रिच जास्त, तितक्या जाहिराती जास्त. त्यामुळे रिल स्टारला मोठी मागणी आहे.

l डिजिटल युगात निवडणुकीचा प्रचार हायटेक झाला आहे. डिजिटल प्रचारावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे.

l सोशल मीडियावर चांगले लिखाण करणाऱ्यांना किंवा कंटेंट रायटर्सना काम मिळत आहे. काही जण तर हातात बूम घेऊन मतदारसंघात फिरून मतदारांच्या प्रतिक्रिया घेताना किंवा उमेदवारांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत.

l अनेक पक्षांतील उमेदवार सध्या संपर्क साधत असल्याची माहिती एका यूटय़ुबरने दिली. रिल्स तयार करण्याचा मोबदलाही चांगला असल्याचे रिल स्टार सांगतात.