मिंध्यांनी वनगांपाठोपाठ गीता जैन यांचा घात केला; मीरा-भाईंदरमधून अपक्ष निवडणूक लढणार

मिंध्यांनी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यापाठोपाठ आमदार गीता जैन यांचा विश्वासघात केला आहे. मीरा-भाईंदरमधून ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले असून माजी आमदार नरेंद्र मेहता यांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गीता जैन यांनी मीरा-भाईंदरमधून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेबरोबर गद्दारी केल्यानंतर सुरत व्हाया गुवाहाटीला गेलेल्या 39 जणांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र वनगा यांच्यापाठोपाठ भाईंदरमधून गीता जैन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मिंध्यांची मुस्कटदाबी करत भाजपने हा मतदारसंघ हायजॅक केला असून या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मिंधेंचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पहिल्याच निवडणुकीत पाळला नाही, असा संताप गीता जैन यांनी व्यक्त केला. मेहता यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र त्यांनी सॉरी म्हणून फोन ठेवला. त्यांनीदेखील माझी साथ दिली नाही, अशी खंतही जैन यांनी व्यक्त केली.

राजीनामे पडले

दरम्यान, गीता जैन यांना तिकीट नाकारल्याने भाजपच्या माजी नगरसेविका व प्रदेश सचिव डॉ. नयना वसानी, माजी नगरसेवक अश्विन कसोदरिया व माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.