भाजपने विश्वासघात केला या म्हणण्यावर आजही ठाम, महादेव जानकर यांचे प्रतिपादन

mahadev-jankar

‘भाजपने आमचा विश्वासघातच केला आहे’, या म्हणण्यावर मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

नगरमध्ये रासपच्या कार्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर जानकर पत्रकारांशी बोलत होते. जानकर म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष जिंतुर आणि दौंडची जागा आम्हाला देणार होते. मात्र, त्यांनी ती जागा आम्हाला दिली नाही. याचा जाब भाजपच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे’, या मतावर मी आजही ठाम आहे आणि उद्याही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

रासप स्वतंत्र पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या निवडणुकीत, सत्तेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, असे जानकर म्हणाले. सध्या राज्यात ईडी व इतर चौकशांचा ससेमिरा सुरू आहे, याबाबत ते म्हणाले, ‘एखाद्यावर विनाकारण आरोप करून त्याला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणे योग्य नाही. विनाकारण त्रास देण्याची प्रवृत्ती योग्य नाही. केंद्र सरकारने याचे आत्मचिंतन केले पाहिजे’, असा टोलाही जानकर यांनी लगावला.