लोकसभेत सर्व जागा स्वबळावर लढवणार, महादेव जानकरांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातसह देशातील लोकसभेच्या 523 जागा लढवणार आहे. त्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या असून 19 लोकसभा मतदारसंघात फिरून आलो आहे. बैलगाडा शर्यतीसाठी मी प्रयत्न केले असून ती शर्यत माझ्यामुळे चालू झाली आहे असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी गेली दोन महिन्यापासून विविध राज्यात रथयात्रा सुरू केली आहे. आज ते आंबेगाव तालुक्यात दौऱ्यावर आले असताना त्यांनी मंचर येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभरातील विविध राज्यात रथ यात्रेच्या माध्यमातून पक्षाचे संघटन वाढवायचे काम सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला भाजप व इंडियाकडून कुणीही संपर्क केला नाही पुढील काळात त्यांच्याकडून विचारणा झाल्यास पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल, देशात राष्ट्रीय समाज पक्षाची मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा राहण्यासाठी आम्ही लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असून आम्हाला विचारल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही असे संख्याबळ आमचे असेल. भाजपने मोठ्या पक्षांना जवळ केल्यामुळे त्यांना छोट्या पक्षाची गरज राहिली नाही आता आम्ही आमचेच घर मोठे करणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी शाहू महाराजांनी पहिले आरक्षण दिले मात्र त्यांच्याच जातीला शंभर वर्षांनी आरक्षण मागवे लागते आहे ही शोकांतिका आहे. मराठा, धनगर, मुस्लीम या समाजाला आरक्षण मिळायला हवे भाजप, काँग्रेस कधीही आरक्षण देऊ शकत नाही ते फक्त झुलवत ठेवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यास दोन दिवसात आरक्षण दिले जाईल असे ते यावेळी म्हणाले. तसेच आपली सत्ता आल्यास शेतकरी, तरुणांचे रोजगार, शिक्षण क्षेत्रात काम केले जाईल असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजाताई मुंडे या माझ्या भगिनी असून त्या मोठ्या पक्षात आहे त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांनी मला याबाबत सांगितल्यास त्यांना सांभाळायची जबाबदारी माझी आहे असे ते म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघा बाबत विचारले असता त्यांनी ज्याप्रमाणे आमचे बारामती लोकसभा मतदारसंघावर प्रेम आहे. त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघावर देखील प्रेम आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघही लढवणार असल्याचे सांगितले.

राज्याचा पशुसंवर्धन मंत्री असताना बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केले. दीड कोटी रुपये देऊन मोठा वकील देऊन न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे माझ्याकडे आले होते. शेतकरी बैलावर जिवापाड प्रेम करतो आम्ही सुद्धा शेतकरी आहोत. मंत्री म्हणून मी न्यायालयात उभा राहिलो माझ्यामुळेच बैलगाड्याचा निकाल लागला असून बैलगाडा शर्यत मी चालू केली आहे असे जानकर म्हणाले.