‘शासन आपल्या दारी’ उधळून लावण्याच्या इशाऱयाने सरकारची तंतरली, महाड, माणगावात मध्यरात्री शिवसैनिकांची धरपकड

लोणेरेतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देताच तंतरलेल्या मिंधे सरकारने आज रायगडातील शिवसैनिकांवर अक्षरशः दडपशाही केली. माणगाव, महाडमध्ये मध्यरात्री अडीच-तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे जथेच्या जथे घराघरात घुसले आणि त्यांनी शिवसैनिकांची धरपकड केली. या सर्व बहाद्दर शिवसैनिकांना पोलीस व्हॅनच्या पिंजऱयात डांबून अलिबागच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. सायंकाळी 4 वाजता खोके सरकारचा कार्यक्रम संपल्याची बातमी मिळताच पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या वाघांना सोडून दिले. दरम्यान, पोलिसांच्या आडून दोन दिवसांपासून शिवसैनिकांवर जुलूम करणाऱया मिंधे सरकारविरोधात रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

मिंध्यांचे आमदार भरत गोगावले यांनी पोपटपंची करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. याविरोधात महाडमध्ये आंदोलन करणाऱया शिवसैनिकांवर मिंध्यांच्या गुंडांनी दडपशाही करून छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालण्यास मज्जाव केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत शिवरायांची आणि शिवसेनाप्रमुखांची जाहीर माफी मागावी, अन्यथा जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या नेतृत्वाखाली लोणेरेतील आजचा शासकीय कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला होता. यामुळे गाळण उडालेल्या सरकारने दोन दिवसांपूर्वी महाड, माणगावमधील शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या. रायगडच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱयांपुढे उभे करत 20 हजारांचा जामीन घेण्यात आला. तसेच वर्षभर कोणत्याही आंदोलनात भाग घ्यायचा नाही, असे फर्मान काढण्यात आले.

नॅपकीनवाल्या शेठचा पोलिसांवर दबाव

शिवसैनिकांना कितीही अडवले तरी ते कार्यक्रमस्थळी घुसून आंदोलन करतील आणि आपली नाचक्की होईल याची भीती मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांना होती. त्यामुळे त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच पह्न करून एकही शिवसैनिक कार्यक्रमस्थळी आला तर तुमची बदली होईल, अशी धमकी दिल्याची चर्चा महाड, माणगावात होती.

पिंजरा व्हॅनमधून अलिबागला नेले

गुरुवारी मध्यरात्री अडीच-तीनच्या सुमारास सर्व जण साखरझोपेत असतानाच पोलिसांच्या तुकडय़ा महाड, माणगावातील शिवसैनिकांच्या घरावर धडकल्या. तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल, असे सांगत तब्बल 70 ते 80 शिवसैनिकांना व्हॅनमध्ये काsंबून पोलिसांनी माणगावात आणले. त्यात जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, महाडचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, माणगाव शहरप्रमुख अजित तारलेकर, युवासेना शहर अधिकारी अजिंक्य जाधव, उपशहरप्रमुख अनिल सोनार, शिरगाव सरपंच व महाड विधानसभा समन्वयक सोमनाथ ओझर्डे, महाड तालुकाप्रमुख आशीष फळसकर, पोलादपूर तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, युवासेना तालुका अधिकारी प्रफुल्ल धोंडगे, नितीन साळवी, खरवली सरपंच चैतन्य म्हामूणकर, बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य शकील माटवणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देशमुख यांच्यासह अन्य बहाद्दर शिवसैनिकांचा समावेश होता. नंतर या सर्वांना पोलिसांच्या पिंजरा व्हॅनमध्ये काsंबून अलिबागला नेण्यात आले. तेथे त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात डांबून ठेवण्यात आले.

दुपारनंतर लोणेरेतील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम संपल्याचा रिपोर्ट अलिबाग पोलिसांना आला. त्यानंतर त्यांनी डांबून ठेवलेल्या शिवसैनिकांची सुटका केली. शिवसेना नेते अनंत गीते यांनी अलिबागमध्ये जाऊन या शिवसैनिकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाडचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवरायांची माफी मागायला मुख्यमंत्र्यांना कमीपणा का वाटतो?

शिवराय व शिवसेनाप्रमुखांचा अवमान करणाऱया भरत गोगावले आणि त्यांच्या गुंड पंपनीच्या कृत्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र सरकारने यंत्रणेच्या आडून गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिकांवर दडपशाही केली. माफी मागितली असती तर आंदोलनाचा प्रश्नच नव्हता, परंतु मुख्यमंत्र्यांना शिवरायांची माफी मागायला कमीपणा का वाटतो, असा सवाल जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी केला आहे.

खोके सरकारला धडा शिकवणारच

जुलूम करणाऱया मिंधे सरकारचा निवडणुकीत वचपा काढून गद्दारांना धडा शिकवू, असा इशारा या वेळी दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी दिला.

शिवसैनिक डगमगणार नाहीत -अनंत गीते

भाजप, मिंध्यांना सत्तेची मस्ती आली आहे. यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्यापलीकडे यांना कोणतेही उद्योग नाहीत. महाड, माणगावमधील शिवसैनिकांना घराघरातून उचलून सरकारने केलेले हे कृत्य निषेधार्ह आहे. मात्र कितीही दडपशाही करा, शिवसैनिक डगमगणार नाहीत, असा इशारा शिवसेना नेते अनंत गीते यांनी दिला.