महाराष्ट्रात महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकेल; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

हरयाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप पुढे असं चित्र सध्या आहे. काँग्रेसने दावा केला आहे की हरयाणात काँग्रेसच्या नेतृत्त्वात सरकार येईल. भाजपने सध्या आघाडी घेतलेली असली तरी काँग्रेसही काँटें की टक्कर देत आहे. यासंदर्भात बोलतना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात लाट आहे. तिथली जनता कोणत्याही परिस्थितीत यंदा भाजपला निवडून देणार नाही. सध्या सुरुवातीचे कल येत असून हरयाणामध्ये काँग्रेस, तर जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार बनेल. मोदींचा कृत्रिम जलवा संपला असून त्यांचा मुखवटा उतरला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

सध्या देशात कुठेही निवडणूक घेतली, अगदी उत्तर प्रदेश, गुजरातमध्येही निवडणूक घेतली तरी मोदी-शहा आणि त्यांचा पक्ष पराभूत होईल. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकेल. भाजप कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पराभूत होईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

हरयाणामध्ये सुरुवातीच्या कलानंतर भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दाखवत आहे. याबाबत राऊत म्हणाले की, निवडणूक म्हणजे काय, भाजपाच आहे. काहीही करू शकतात. अजून बरेच निकाल यायचे असून यात वर खाली होत राहते. बऱ्याच फेऱ्या बाकी असून हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही, असेही ते म्हणाले.

Live J&K, Haryana ELECTION RESULTS: हरियाणात पुन्हा भाजपला आघाडी; काँग्रेसची घसरण

काल हरयाणाचे मुख्यमंत्री नायक सैनी सांगत होते की, निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे. आज सकाळी ते आघाडीवर होते आणि आता पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे. मात्र सर्व फेऱ्यांची मोजणी होऊ द्या. हरयाणाची जनता स्वाभिमानी आणि मराठ्यांप्रमाणे लढवय्यी आहे, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आम्ही एकत्र लढू. इथे 288 जागा आहेत. हरयाणा, जम्मू-काश्मीरच्या निकालाने काँग्रेसला टॉनिक मिळाले असून याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. शिवसेनेकडे टॉनिक आहेत. आमची संघटना जमिनीवर काम करते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून अनेक राज्यात निवडणूक लढते. आम्ही एकजुटीने लढू आणि मोदी-शहांच्या हुकुमशाहीला महाराष्ट्रातून हद्दपार करू.

या निकालांचा महाराष्ट्राच्या जागावाटपावर काहीही परिणाम होणार नाही. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांना इथे येऊन मुख्यमंत्री बनायचे नाही. इथे काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि जागावाटप कशाप्रकारे व्हायला पाहिजे? कशा पद्धतीने ते पुढे जाईल? हे आम्हाला माहिती आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये जागावाटपाचे टास्क पूर्ण होईल आणि दसऱ्याच्या आधी यादी तयार झालेली असेल, असेही राऊत म्हणाले.