विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार; अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती!

राज्यातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंब महिन्याच्या शेवटच्या किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागांवर झेंडा फडकवला. त्यामुळे राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट झाले असून विधानसभेलाही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतूनच ही बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.

रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक ट्विट करत राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. भाजपच्या एका अंतर्गत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत, असे रोहित पवार यांनी नमूद केले.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय, असा दावाही रोहित पवार यांनी केला.

कर्जत-जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे, असा अशाराही रोहित पवार यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी

दरम्यान, नामांकित सर्व्हे एजन्सी ‘लोक पोल’ने एक सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडी निवडणुकीत बहुमताचा आकडा सहज पार करेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणात महाविकास आघाडी 141-154 जागा जिंकेल आणि महायुतीला 115-128 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. यापूर्वी ‘लोक पोल’ या संस्थेने कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हे केले होते. या सर्व्हेतील मांडलेले अंदाज निवडणुकांच्या निकालानंतर खरे ठरले होते.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!