लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सहा पैकी चार जागांवर दणदणीत विजय मिळवून महायुतीला पराभवाची धूळ चारली. नाशिकमधून शिवसेना पक्षाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे, धुळे येथून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांनी दणदणीत विजय मिळविला.
नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी 6,14,517 मते मिळवली. 1,61,103 इतके मताधिक्य घेऊन त्यांनी महायुतीचे मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा धुव्वा उडवला. गोडसे यांना 4,53,414, तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना 47,114 आणि अपक्ष शांतीगिरी महाराज यांना 44,415 मते मिळाली.
नाशिकमध्ये आवाज शिवसेनेचाच
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती कायम ठेवली. पहिल्या फेरीत त्यांना 30 हजार 106 मते आणि 10 हजार 752 ची आघाडी होती. त्यात फेरीगणिक वाढ होत होत 11 व्या फेरीअखेर मते 3 लाख 9 हजार 329 व मताधिक्य हे 1 लाख 3 हजार 391 वर पोहोचले. विसाव्या फेरीअखेर त्यांनी दीड लाखाहून अधिकची आघाडी घेतली, शेवटच्या तिसाव्या फेरीअखेर 1 लाख 61 हजार 103 मतांनी ते विजयी झाले. मताधिक्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. अंबडच्या मतमोजणी पेंद्राजवळ उपस्थित शेकडो शिवसैनिकांकडून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला जात होता. महिला शिवसैनिकांनी फुगडय़ांवर फेर धरला. त्यानंतर शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पेढे वाटप करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या जयघोषाने आसमंत निनादला.