हेडफोन लावून ट्रॅकवर बसणं ठरलं जीवघेणं, BBA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

हेडफोन घालून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. वारंवार बजावले जात असतानाही हेडफोनबाबतच्या सूचनांकडे कानाडोळा केला जातो. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडफोन लावून ट्रॅकवर बसणे एका विद्यार्थ्यासाठी जीवघेणे ठरले आहे. ही घटना हबीबगंज-इटारसी ट्रॅकवरची आहे.

मानराज तोमर (20) असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो बीबीएचा विद्यार्थी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानराज आपल्या मित्रासोबत दानापानी परिसरातील रेल्वेट्रॅकवर बसला होता. दोन्ही मित्र वेगवेगळ्या ट्रॅकवर बसून मोबाईल पाहत होते. मानराजने कानात हेडफोनही घातला होता. दरम्यान तो ज्या ट्रॅकवर बसला होता, तिथे ट्रेन आली. मात्र मोबाईलमध्ये व्यग्र असलेल्या दोन्ही मित्रांचे ट्रेनकडे लक्षच गेले नाही आणि मानराजचे ट्रेनने डोकेच उडवले.

मानराज भोपाळमधील एका खासगी महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत होते. त्याला शरिरसौष्ठव आणि रील्स बनविण्याची आवड होती. सध्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता होता.