वेबसीरिज – कोर्टरूमबाहेरचा ड्रामा

>> तरंग वैद्य

न्यायालयाबाहेरील कथेवर भर देत वकिलांच्या समस्या, व्यथा, त्यांची ‘केस’ मिळवण्यासाठीची धडपड हे मुद्दे दर्शवणारी ‘मामला लीगल है’ ही मालिका. विषय गंभीर असला तरी हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडल्याने प्रेक्षक कथेशी एकरूप होतो.

’मामला लीगल है’ या नावाने नेटफ्लिक्स ओटीटीवर 01 मार्च 2024 रोजी 40 मिनिटांचे आठ भाग असलेली वेब सीरिज दाखल झाली आहे. नावावरूनच समजते की, कथा कायदा-व्यवस्थेवर आधारित असणार. त्यामुळे सुरुवातीला मालिका बघावी की नाही, असा थोडा संभ्रम निर्माण झाला. कारण कायदा काहीसा नीरस, शुष्क विषय आहे. अनेक चित्रपटांत, मालिकांमध्ये वकिलांचे मोठमोठाले संवाद, कोर्टातील दृश्ये अनेक वेळा बघितली आहेत. त्यामुळे यात काय वेगळे किंवा नवीन असणार असे वाटणे साहजिक आहे, पण एकदा सुरुवात केल्यावर आपण आवडीने बघू लागतो अशी ही मालिका आहे.

या मालिकेचे वैशिष्टय़ म्हणजे यात ‘कोर्टरूम ड्रामा’ कमी असून न्यायालयाबाहेरील कथेवर जास्त भर दिला आहे. वकिलांच्या समस्या, व्यथा, त्यांची ‘केस’ मिळवण्यासाठीची धडपड हे मुद्दे दाखवले आहेत. वर लिहिल्याप्रमाणे विषय गंभीर असला तरी तो हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडला आहे. भाषा पण क्लिष्ट नसून साधी, सोपी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आहे.

कथेचा मुख्य पात्र अ‍ॅडव्होकेट व्ही. डी. त्यागी आहे, जो पडपडगंज नावाच्या सत्र न्यायालयात आपली वकिली करीत आहे. त्याला वकिलीशिवाय संघटनेचे अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा असते आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. याच परिसरात ‘सुजाता’ नावाची महिला वकील आहे, तिला स्वतवर विश्वास नसल्यामुळे ती आलेली केस मोठय़ा वकिलांकडे सोपवून बदल्यात पैसे (कमिशन) घेत असते. तिची खंत आणि एकच इच्छा असते की, तिच्याकडे बसायला स्वतचे ‘चेंबर’ असावे. नैना श्रॉफ परदेशातून वकिलीचे उच्चशिक्षण घेऊन स्वतचा वकिली व्यवसाय स्थापित करण्यासाठी पडपडगंज येथे आली असते. ही तिन्ही पात्रे कथेचा डोलारा सांभाळत कथा रंजक पद्धतीने पुढे नेतात.

चेंबर किंवा कक्ष कमी आणि वकील खूप जास्त असल्यामुळे वकिलांना उन्हात खुर्ची, टेबल टाकून बसावे लागते. पण काहींच्या नशिबी तर हे सुख पण नसते. आपण कधी न्यायालय परिसरात गेलो तर ही परिस्थिती उघडय़ा डोळ्यांनी पाहतो. परिसरात येऊन गोंधळ घालणाऱया माकडांचा त्रास दाखवत या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पदवी असूनही जम बसवण्यासाठी धडपड तर वेगळीच, पण साधी बसायला जागा मिळवण्यासाठीची धडपड किती त्रासदायक हे कटू सत्य आपण या मालिकेच्या माध्यमातून बघतो. संघटनेच्या अध्यक्ष पदासाठीची निवडणूक, प्रचार, कुरघोडी, राजकारण मालिकेतील विषय आहे. आजचा दिवस संघर्षाचा, पण उद्या चांगला दिवस येईल या आशेवर कथासूत्र बांधले आहे. त्यामुळे मालिका सकारात्मक वाटते. वकील म्हणजे काळा कोट घातलेला माणूस इतकेच आपल्याला माहीत असते, पण त्यांचे आयुष्य, त्यांचे विश्व बघायचे असेल तर ही वेब सीरिज बघा.

त्यागी वकील कथेचा मुख्य पात्र, जो निभावला आहे रवी किशन याने. तो खूप महत्त्वाकांक्षी असून त्याला पुढे खूप काही करायचे असते, आपले नाव प्रस्थापित करायचे असते. त्यासाठीचे त्याचे प्रयत्न त्याने नीट सांभाळले आहेत. बऱयाच वेळा वडिलांनी आपल्यासाठी काहीच केले नाही असा मुलाचा ग्रह असतो आणि त्यामुळे वडील-मुलामध्ये एक अंतर निर्माण झालेले असते. त्यागी आणि त्याच्या न्यायाधीश वडिलांमध्येही हे अंतर असते जे फक्त दोन दृश्यांमधून दाखवण्यात आले आहे, पण रवी आणि वरिष्ठ नट राजेंद्र गुप्ता यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ते प्रभावी केले आहेत. नवीन नायला ग्रेवाल जम बसवायचा प्रयत्नात असलेल्या वकिलाच्या भूमिकेत आहे. स्वप्न साकार करतानाची वास्तविकता दगडासारखी कठोर असते हे तिला रोजच्या अनुभवांवरून कळत जाते जे तिने आपल्या अभिनयातून दाखवले आहे. निधी बिष्टने सुजाताची भूमिका उत्तम निभावली आहे. ब्रिजेंद्र काला, यशपाल शर्मा, तन्वी आजमी, विवेक मुश्रनसारखे मोठे कलाकार छोटय़ा, पण प्रभावशाली भूमिकेत आहेत.

कथेत जातबिरादरी, बालविवाहसारखे गंभीर मुद्देही सहज आणि मनोरंजक पद्धतीने चित्रित केले आहेत. एकूणच संपूर्ण मालिका रोजच्या घटनांवर आधारित असून तितक्याच सोप्या पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे प्रेक्षक पटकन कथेशी एकरूप होतो आणि वकिलांच्या दिनचर्येवर आधारित आठ भाग न कंटाळता बघतो.

डॉक्टर्स, व्यावसायिक, शेतकरी, कॉर्पोरेट्सवर अनेक मालिका, चित्रपट आले, पण वकिलांवर मोजकेच आणि ‘मामला लीगल है’ त्या मोजक्यातील एक. त्यामुळे बघायला विसरू नका.

[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)