अंधेरीत बुधवारी अतिवृष्टीत उघडय़ा गटारात पडून विमल गायकवाड यांचा झालेला मृत्यू मेट्रोचे काम करणारी एल अॅण्ड टी कंपनी आणि एमएमआरसीएल प्राधिकरण जबाबदार असल्याचा ठपका पालिकेने चौकशीसाठी नेमलेल्या उच्च स्तरीय समितीने ठेवला आहे. शिवाय स्थानिक पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू ओढवला. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला. ही दुर्घटना घडलेले ठिकाण आणि परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशन लिमिटेडचे कंत्राटदार एल अॅण्ड टी यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एल अॅण्ड टी तसेच एमएमआरसीएल यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे.