LPG Price Hike – ऑक्टोबरमध्ये महागाईचे ‘चटके’, सलग तिसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका उडाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दसऱ्याआधीच महागाईचे सिमोल्लंघन झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करतात. आजही गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले असून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये जवळपास 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. याचा फटका छोट्या व्यावसायिकांसह हॉटेल चालवणाऱ्यांनी बसणार असून यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

तीन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या तीन महिन्यांपासून वाढतच आहेत. 1 ऑगस्ट रोजी यात 8.50 रुपये, 1 सप्टेंबर रोजी 39 रुपये आणि आता 1 ऑक्टोबर रोजी 48.50 रुपये वाढ करण्यात आली.

नवीन दरांनुसार आता देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडप 1740 रुपयांना मिळेल. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये हा सिलिंडर 1692.50 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 1850.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 1903 रुपयांना मिळेल.

दरम्यान, एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 803 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना मिळत आहे.