कोयता, पिस्तुलाच्या धाकाने 40 लाखांचे दागिने लुटले; वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाई शहरातील सराफ बाजारपेठेत कारागिरांना कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल 40 लाखांचे सोने लुटल्याची घटना घडली. यात सुमारे 58 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले असून, याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत संजय मयंती यांनी फिर्याद दिली.

वाई येथील लक्ष्मीनारायण या सराफ बाजारपेठेत संजय जयंता मयंती व मृत्युंजय जयंता मयंती या दोन बंगाली भावांची दुकाने आहेत. हे दोघे भाऊ आपल्या दुकानात सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतात. रविवारी रात्री बाजारपेठ बंद झाल्याचा गैरफायदा घेऊन पावसाळी कपडे व चेहऱ्याला मुखपट्टी लावलेल्या दोन अज्ञात युवकांनी संजय मयंती यांच्या दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी त्यांना कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून शटर अर्ध्यावर घेत मारहाणही केली. तसेच दुकानात दागिने घडवण्यासाठी आलेले 25 लाख 95 हजार 600 रुपयांचे सुमारे 38 तोळे वजनाचे सोने चोरले. तसेच, संजय व त्यांच्या कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा संजय यांचा भाऊ मृत्युंजय यांच्या दुकानाकडे वळवला. त्यांनाही पिस्तुलाचा धाक दाखवत 13 लाख 75 हजारांचे 20 तोळे सोने घेऊन पळ काढला. या घटनेत 39 लाख 69 हजार रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारण्यात आला आहे.

या घटेनची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी धाक घेत पाहणी केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पदाधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनीही पाहणी केली. घटनेनंतर श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही भेट देत पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. या घटनेने वाई शहरात खळबळ उडाली आहे.