शेअर बाजारात हेराफेरी; अमित शहा यांच्या विरोधात इंडिया आघाडीची सेबीकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर खरेदी करण्याचे आवाहन केले होते. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर शेअर बाजार वधारला आणि चोवीस तासांत कोसळला. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे सुमारे 30 लाख कोटी रुपये बुडाले. पण ठरावीक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा कोटय़वधी रुपयांचा फायदा झाला. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात झालेल्या या हेराफेरीशी अमित शहा यांचा काही संबंध आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी ‘सेबी’कडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी शेअर बाजारात झालेली विक्रमी वाढ आणि त्यानंतर झटक्यात कोसळलेला बाजार हा एक मोठा घोटाळा असून याची जेपीसी चौकशी करण्याची मागणी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज शेअर बाजारातील या हेराफेरीबाबत सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड आँफ इंडिया अर्थात ‘सेबी’कडे निवडणूक काळात अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भ देत तक्रार दाखल केली आहे. या शिष्टमंडळात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, एक्झिट पोलमधील आकडेवारीनंतर शेअर बाजार वधारला. एक्झिट पोल करणाऱया संस्थांचे राजकीय नेत्यांबरोबर संबंध आहे का? पडलेला बाजार एक्झिट पोलच्या दिवशी वधारला आणि नंतर पुन्हा पडला. यामध्ये गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, मात्र यामध्ये राजकीय नेते व त्यांच्या कुटुंबीयांनी नफा कमावला. याच्याशी अमित शहा यांचा काही संबंध आहे का याची चौकशी करण्याची आम्ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांची घेतली भेट

सेबीकडे तक्रार करणाऱया शिष्टमंडळाने ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यात तृणमूलच्या खासदारांसह शिवसेना नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा समावेश होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सर्वांनी भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लोकसभा निवडणूक निकालाच्या म्हणजे 4 जून आधी जास्तीत जास्त शेअर खरेदी करण्याचे वक्तव्य केले होते. याचा आणि शेअर बाजारातील चढउताराचा काही संबंध आहे का याचा तपास करून कारवाई करावी.

लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोल घेणाऱया संस्था, प्रत्यक्ष लोकसभा निकालाच्या आधी शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात झालेली शेअर्सची खरेदी, निकालानंतर शेअर बाजार पडल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे झालेले आर्थिक नुकसान या सर्वांचा राजकीय संबंध आहे का याचा तपास करण्यात यावा.

निवडणुकीआधी पडलेला बाजार एक्झिट पोलच्या दिवशी वधारला आणि नंतर पुन्हा पडला. 24 तासांमध्ये गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटींचे नुकसान झाले, मात्र चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा नफा झाला. इतरही अनेक उदाहरणं आहेत ज्यात राजकीय नेते किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी भरपूर पैसा आणि नफा कमवला.