उत्तर-मध्य मुंबई लोकसभा वार्तापत्र; भाजपमधली नाराजी महाविकास आघाडीला लाभदायी

>>वैभव शिरवडकर
उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदच्यात थेट मुकाबला होणार आहे. प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यामुळे पहिल्यांदाच खासदारकीला उभ्या राहिलेल्या प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही लढाई काहीशी सोपी होणार आहे. त्यातुलनेत माजी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी भाजप नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांशी अजूनही जुळवून घेतलेले नाही. उत्तर-मध्य मतदारसंघासाठी आमदार आशीष शेलार, अमित साटम आणि पराग अळवणी यांची नावे चर्चेत असताना अचानक अॅड. निकम यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजप नेते, कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात असलेली नाराजी उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या पथ्यावर पडणार आहे.
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा ओढा परंपरेने काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत भाजप, संघ परिवार आणि मतदारसंघातही फारशा सक्रिय नसलेल्या पूनम महाजन दोन वेळा तरून गेल्या. त्यात आता भाजपने राजकीय अनुभव नसलेल्या, पण हाय प्रोफाईल खटले चालवणारे वकील म्हणून परिचित अशा निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे मूळचे जळगावचे असून भाजपचे साधे कार्यकर्तेही नाहीत. भाजपचे अनुभवी नेते असताना निकम यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नेते, कार्यकर्ते आणि मतदारही नाराज आहेत. निकम यांना कोणत्या निकषांवर उमेदवारी दिली, याबाबत मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या उलट उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचे पिता एकनाथ गायकवाड खासदार होते. त्याचबरोबर काँग्रेस विचारधारेला मानणारे विविध समाजघटक मतदारसंघात असल्याचा फायदाही वर्षा गायकवाड यांना होणार आहे. या मतदारसंघात एकूण 27 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीचा पेपर महायुतीला कठीण
उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात 17 लाख 44 हजार 128 मतदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात येणाऱया सहा विधानसभापैकी कालिनात शिवसेनेचे संजय पोतनीस आणि वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्धिकी आमदार आहेत. विलेपार्ले येथून भाजपचे पराग अळवणी आणि वांद्रे पश्चिममध्ये आशीष शेलार आमदार आहेत. तर चांदिवलीत दिलीप लांडे आणि कुर्ला येथे मंगेश कुडाळकर मिंधे गटाचे आमदार आहेत. राजकीय बलाबलाचा विचार करता महायुतीचे वर्चस्व येथे दिसत असले तरी सलग दोन वेळा येथून निवडून गेलेल्या पूनम महाजन खासदार म्हणून अपयशी ठरल्या आहेत. विमानतळ परिसरातील झोपडय़ांचा पुनर्विकास, तसेच फनेल झोनमुळे इमारतींच्या उंचीवर असलेले निर्बंध यासंदर्भात केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही तोडगा काढता आला नाही. यामुळे मतदारांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे यंदा महायुतीला निवडणुकीचा पेपर कठीण जाण्याची शक्यता आहे.
असे आहे भाषिक समीकरण
मराठी – 34 टक्के
मुस्लिम – 24 टक्के
उत्तर भारतीय – 15 टक्के
गुजराती-राजस्थानी – 11 टक्के
दक्षिण हिंदुस्थानी- 9 टक्के
ख्रिश्चन – 5 टक्के
पहिल्यांदाच भाजपचा चेहरा नसलेला उमेदवार
देशात 2014 आणि 2019 पर्यंत मोदींची लाट होती. मात्र आता देशात मोदींविरोधी लाट असून मोदी आणि भाजप नेत्यांच्या खोटय़ा आश्वासनांचा दरदिवशी विरोधी पक्ष चिरफाड करत आहेत. भाजपचे देशपातळीसह राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष पह्डून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे कारस्थान, भाजपच्या सांगण्यावरून मिंधे गटाची शिवसेनेवर चिखलफेक या सर्व गोष्टी मतदारराजा विसरलेला नाही. त्यात आता उत्तर-मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा चेहरामोहरा नसलेल्या निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप नेते, कार्यकर्त्यांपासून सर्वांमध्ये नाराजी आहे. त्यात मोदींकडे बघून मत देण्यासाठी आता तिसऱयांदा मतदारराजा तयार नाही.