मिंध्यांची अवस्था ना घर का ना घाट का; निम्मे खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात मिंधे गटाच्या खासदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून ते पाहून आमदारांमध्येही चलबिचल सुरू आहे. मिंधे गटाचे निम्मे खासदार आणि अर्धेअधिक आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

भारतीय जनता पक्षाने मिंधे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट केला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून मिंधे गटावर टीका केली जात आहे. आज विजय वडेट्टीवार यांनीही मिंधे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे भेटत नाहीत असा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना आता लोकसभा मतदारसंघ मिळत नाहीत अशी वेळ आली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार गटातही अस्वस्थता

खासदारांची अवस्था पाहून मिंधे गटाचे आमदार आता घाबरले आहेत. 13 खासदारांमध्ये ही अवस्था असेल तर 288 आमदारांमध्ये आपली काय होणार अशी भीती त्यांना वाटत आहे. मिंधे गटाचे अर्धेअधिक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपका&त असल्याची माहिती मिळाली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मिंधे गटाची अवस्था पाहून राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार गटामध्येही अस्वस्थता असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

सांगलीचा विषय आम्ही ताणून धरणार नाही

सांगली मतदारसंघाच्या जागेबाबत आता वाद घालण्यात अर्थ नसून काँग्रेस आता हा विषय ताणून धरणार नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत आता पक्षश्रेष्ठाrच निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही काम करू, असे ते म्हणाले.