महासभा एकनिष्ठेची : उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाणे, डोंबिवलीत धडाडणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज गुरुवारी ठाणे आणि डोंबिवलीमध्ये धडाडणार आहे. ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार राजन विचारे व कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. डोंबिवलीची सभा भागशाळा मैदानावर सायंकाळी 6 वाजता तर ठाण्याची सभा गडकरी रंगायतनसमोर रात्री 8 वाजता होणार आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण, ठाण्यात उद्धव ठाकरे गद्दारांचा कसा समाचार घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचार फेऱयांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. आता त्यावर विरोधकांना भीमटोला देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा कल्याण आणि ठाण्यात होणार आहेत. या सभांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेना, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून कल्याण, ठाण्यात अवघा माहोल भगवा झाला आहे.

डोंबिवली ः भागशाळा मैदान,
वेळ ः सायंकाळी 6 वा.

ठाणे ः गडकरी रंगायतनसमोर,
वेळ ः रात्री 8 वा.