पतंगराव, आर. आर. आबा हे दिलदार मनाचे मोठे नेते, शिवसेना नेते संजय राऊत यांचे प्रतिपादन

डॉ. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे प्रतिभावंत, दिलदार मनाचे मोठे नेते होते. राजकारणापलीकडे त्यांनी मैत्री जपली होती. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांनी उमटवला होता, अशा भावना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.

सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सलग दुसऱया दिवशी सांगली जिल्हय़ातील तासगाव, विटा, कडेगाव, पलूस विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी तासगाव येथे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच कडेगाव येथे दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सांगली लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, तासगाव तालुकाप्रमुख प्रदीपकाका माने, विलास जमदाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी होते.

डॉ. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे प्रतिभावंत, दिलदार मनाचे मोठे नेते होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. राजकारणापलीकडे त्यांनी मैत्री जपली होती आणि दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तासगाव मतदारसंघाला आर. आर. पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे आता चंद्रहार पाटील हा एक प्रामाणिक उमेदवार उभा आहे. त्याची पाटी कोरी आहे. त्याच्यावर कोणताही कलंक नाही. तो इतरांसारखा घोटाळेबाज नाही, अशा माणसाच्या मागे उभे राहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली पाहिजे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.