महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल; सांगलीचा विषय संपला – संजय राऊत

देशात या वेळी सत्तांतर अटळ असून त्यासाठी चार राज्ये निर्णायक ठरतील. पण गेम चेंजिंगची महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्राची असणार आहे. राज्यातील लोकसभेच्या 48पैकी किमान 35 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सांगली येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांची उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे सांगलीचा विषय संपलेला आहे. काँग्रेसचीही नाराजी संपेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, सध्या राज्यातच नव्हे तर देशात सांगली लोकसभेची चर्चा सुरू आहे. सांगलीतून शिवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार हा विश्वास आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीने अडीच वर्ष सरकार उत्तमपणे चालवले. पण काहींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आता हेच लोक 400 पारचा नारा देत आहेत. पण भाजपचा हा नारा फसवा आणि भंपक आहे. देशाला आता नरेंद्र मोदी नकोत. मोदी पंतप्रधान होता कामा नये अशी लोकांची मानसिकता झालेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मैत्रीपूर्ण लढतीची भाषा ही राजकीय अपरिपक्वता

सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसची नाराजी संपेल, अशी मला आशा आहे. मैत्रीपूर्ण लढतीची भाषा ही राजकीय अपरिपक्वता म्हणावी लागेल. मैत्री ही मैत्री असते आणि लढत ही लढतच असते.

संकटात वसंतदादा शिवसेनेच्या पाठीशी राहिले

पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ गुंठेवारी समितीचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना आणि वसंतदादा पाटील यांच्यातील ऋणानुबंध संजय राऊत यांनी सांगितला. शिवसेना मराठी माणसाची शान आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटे आली, त्यावेळी वसंतदादा पाटील ठामपणे उभे राहिले. चंद्रहार पाटील आता तुम्ही वसंतदादांचे स्वप्न पूर्ण करा. यावेळी सांगलीला बदल हवा आहे, त्यामुळे शेतकऱयाचा मुलगा संसदेत पाठवा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. वसंतदादा पाटील हे महान नेते होते. त्यांच्यापासून शिवसेनेने प्रेरणा घेतली आहे. यापुढेही घेऊ. वसंतदादांची या जिह्याच्या विकासाची अपुरी स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने शिवसेनेवर टाकली आहे. आता उमेदवारीचा वाद राहिलेला नाही. सांगलीत बदल झाला, तर महाराष्ट्रात बदल होईल. त्यामुळे सांगलीकरांनी गेल्या दहा वर्षांत केलेली चूक सुधारावी, असे संजय राऊत म्हणाले. या मेळाव्यास उमेदवार चंद्रहार पाटील, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजित पाटील, गुंठेवारी समितीचे राज्याध्यक्ष चंदन चव्हाण उपस्थित होते.