काँग्रेसने दिले ‘वर्षा’वरील राजकीय बैठकांचे पुरावे; सचिन सावंत यांनी सादर केला 24 व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर आता तरी निवडणूक आयोग डोळ्यावरील पट्टी काढून कारवाई करील का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज केला.

वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकांची तक्रार सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. सचिन सावंत यांनी या बैठकीच्या संदर्भातील पुरावे निवडणूक आयोगाला आज सादर केले.

निवडणूक निर्णय अधिकाऱयांना बैठकांचे पुरावे सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, 24 व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह व माध्यमांमधून छापून आलेल्या बातम्यांची प्रत निवडणूक आयोगाला सादर केली. विरोधी पक्षांवर ज्या तत्परतेने कारवाई केली जाते तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत आयोग दाखवताना दिसत नाही. वर्षावरील बैठकांचा पुरावा सादर केल्यानंतर तरी निवडणूक आयोग कारवाई होईल अशी अपेक्षा यावेळी सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

पीयुष गोयल यांच्या होर्डिंगवर आक्षेप

उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पीयुष गोयल हे श्रीरामाचे मोठे हार्ंडग लावून मते मागत आहेत. पश्चिम उपनगरातील मोगरा मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे मोठे हार्ंडग असून त्यात प्रभू रामाचे चित्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे’ असा मजकूर आहे. हे होर्डिंग सरळ सरळ आचारसंहितेचा भंग करणारे आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

सत्ताधाऱयांना अभय

जनप्रतिनिधी कायद्यातील कलम 123 व उपकलम 3 चे हे उल्लंघन आहे. शिवसेनेच्या प्रचार गीतामध्ये ‘भवानी’ शब्द आहे तो काढा अशी नोटीस निवडणूक आयोग पाठवतो, परंतु सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रार केल्यावर निवडणूक आयोग त्यावर कारवाई करत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली