जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत तू घर सोड! खासदारकीला उभ्या राहिलेल्या पतीने आमदार पत्नीला बजावले

काँग्रेस विचारधारेची आमदार पत्नी आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू नये यासाठी बसपच्या तिकिटावर पुन्हा उमेदवारी रिंगणात उतरलेल्या माजी खासदार कंकर मुंजारे यांनी चक्क लोकसभा निवडणूक होईपर्यंत पत्नीला, तू घर सोड नाही तर मी घर सोडतो, असे बजावले आहे. दरम्यान, कोणालाही घर सोडण्याची गरज भासणार नाही. मी माझे घर आणि राजकीय जबाबदारी या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळेन, असे आमदार पत्नी अनुभा मुंजारे यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशातील बालाघाट-सिवनी येथील माजी खासदार कंकर मुंजारे हे या लोकसभा निवडणुकीतून बहुजन समाज पक्षाकडून लोकसभेसाठी उभे राहिले आहेत. त्यांची पत्नी अनुभा या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. दोघांचाही आपापल्या विचारधारेबद्दल ठाम विश्वास आहे. मात्र, काँग्रेसचे उमेदवार सम्राट सरस्वार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कंकर यांना लक्ष्य करत त्यांचा पराभव करू या, असे आवाहन मतदारांना केले. यावर पत्नीही काही बोलली नसल्यामुळे कंकर यांचा पत्नीवर असलेला विश्वासही उडाला आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकसभा निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत आपण एकाच घरात राहायला नको, असे कंकर यांनी पत्नीला बजावले आहे. बालाघाट-सिवनी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप, बसप आणि इतर अपक्ष असे मिळून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत.