कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ – विश्वजीत कदम

‘सांगलीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीने फेरविचार करावा, अशी नम्र विनंती आहे,’ असे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले. तसेच ‘पुढील काही दिवस आपण सांगलीतील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ, त्यांच्या भावना ऐकून घेऊ,’ असेही ते म्हणाले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अंतिम जागावाटप जाहीर केले. आज विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. देशातील सत्ताधारी असलेल्या भाजप या जातीयवादी पक्षाने अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे महागाई, बेरोजगारी वाढली. गुन्हेगारी, महिला अत्याचारांत वाढ झाली आहे. त्याविरुद्ध देशात ‘इंडिया’ आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. सांगलीबाबत पुढील काही दिवस कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजून घेऊ. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आघाडीचे जे अंतिम ध्येय आहे, ते पार पाडू,’ असे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी मला व्यक्तिशः आणि महाविकास आघाडीला आदर आहे. उद्धव ठाकरे जे संघर्षाचे राजकारण करतात, त्याविषयीही आदर असल्याचे कदम यांनी सांगितले.