माढय़ात महायुतीला धक्का; धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपची साथ सोडली

लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कायम ठेवत माढा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील वारंवार करीत होते, पण भाजपने उमेदवार बदलला नाही. त्यामुळे अखेर मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे सांगण्यात येते.

धैर्यशील मोहिते-पाटील यांना फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा पाठिंबा मिळेल असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार हे निश्चित आहे.

14 एप्रिलला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 14 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, तर 16 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरतील. त्यानंतर अकलूजमध्ये प्रचार सभा होईल.

दिवसभरात गाठीभेटी आणि बैठका

z माढा मतदार संघातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.

z माढा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी अजित पवार गटाकडून होत आहे. फलटणमधील कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगीरी निवास्थानी भेट घेऊन रणजितसिंह निंबाळकर आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला.

z देवगिरीवर झालेल्या बैठकीला फलटणचे आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यासोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी महायुतीचं काम करावे लागेल अशा सूचना त्यांना दिल्या आहेत.

z दरम्यान आमदार राहुल कुल यांनी माढय़ात अजित पवार गटाने भाजप उमेदवाराचे काम केले नाही तर बारामतीत त्यांच्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.