Lok Sabha Election 2024 : उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून आणली चिल्लर, अधिकाऱ्यांना फुटला घाम

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. तेथील एका उमेदवाराने 10 हजार रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून भरली आहे. यावेळी चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळाली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अस्लम शाह हसन शाह असे त्यांचे नाव असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर आणली आणि उर्वरित 15 हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचल्यावर 10 हजारांची चिल्लर पाहून निवडणूक अधिकारी सुद्धा चक्रावले. निवडणूक आयोगाने डिपॉझिट रक्कम संदर्भात कोणतेही नियम जाहीर केलेल नाहीत. त्यामुळे 10 हजार रुपयांची चिल्लर घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक होते. 10 हजारांची चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. चिल्लर मोजायला तब्बल 40 मिनिटे लागली. त्यामुले अधिकाऱ्यांचा सुद्धा बराच वेळ 10 हजार रुपये मोजण्यात खर्च झाला.

महाराष्ट्रात एकून पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपलेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदावारांनी उमेदावारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.

महा लोकशाही विकास आघाडीचे बुलढाण्यातील उमेदवाराने प्रसार माध्यामांशी संवाध साधला. “मी उमेदवारी अर्ज भरला आहे. मी समाजासाठी काम करत आहे. त्यामुळेच जनतेकडून वर्गणी घेऊन मी 10 हजार रुपयांची चिल्लर निवडणूक आयोगाला दिली आहे. तसेच, मी मुंबई, नागपूर येथे होणारी अधिवेशने आणि बुलढाण्यातील विविध आंदोलनात सहभान नोंदवला आहे,” असे असलम शाह हसन शाह यांनी सांगितले.

असलम शाह हसन शाह यांच्याव्यतिरिक्त यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदावर मनोज गोडान यांनी सुद्धा काल (01 एप्रिल 2024) रोजी 12,500 रुपयांची चिल्लर अर्ज भरण्यासाठी आणली होती. मात्र मनोज यांना ही रक्कम स्वत: मोजून निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्व रक्कम मोजून जमा केली.