Lok Sabha Elecction 2024 : ईशान्य मुंबईत शिवसेनेचा बोलबाला

>>दीपक पवार

मुलुंड ते शिवाजी नगर-मानखुर्दपर्यंत पसरलेल्या उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील आणि भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या दोन निवडणुकांत भाजपला जरी यश मिळाले असले तरी या मतदारसंघाचा इतिहास पाहता अनेकदा धक्कादायक निकाल येथून लागले आहेत. भाजपचे तीन आमदार आणि एक खासदार असतानाही पायाभूत सुविधांचे प्रश्न मागील दहा वर्षांत मार्गी लागले नाहीत. माजी खासदार असलेल्या संजय दिना पाटील यांनी या मतदारसंघातील समस्यांची जाण आहे. शिवसेनेच्या आमदारांनी येथे उड्डाणपूल, रस्ते, पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या विकासकामांचा बोलबाला असून या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

उत्तर-पूर्व मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम आणि पूर्व तसेच मानखुर्द आणि शिवाजी नगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. शिवसेनेचे सुनील राऊत विक्रोळी, रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम येथून आमदार आहेत. तर मानखुर्द येथून समाजवादी पार्टीचे अबू आझमी, मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा, घाटकोपर पूर्व येथे  पराग शहा आणि घाटकोपर पश्चिम येथून राम कदम हे भाजपचे आमदार आहेत. येथील विद्यमान भाजप खासदार मनोज कोटक यांनी गेल्या पाच वर्षांत कुठलीही विकासकामे तडीस नेलेली नाहीत. त्यांच्याविषयी मतदारसंघात असलेल्या नाराजीच्या सुरामुळे  कोटक यांच तिकीट कापून आमदार असलेल्या मिहीर कोटेचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

शिवसेना आमदारांचा विकासकामांचा धडाका

उत्तर-पूर्व लोकसभेतील शिवसेनेच्या आमदारांनी पाठपुरावा करून अनेक विकासकामे तडीस नेली आहेत. विक्रोळीचे आमदार सुनील राऊत येथील नागरिकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. टागोर नगर येथे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असा तरणतलाव उभा राहिला आहे. सोलर ऊर्जा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकास यासारखे प्रश्न मार्गी लावले. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे भांडुपमध्येही पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणापासून ते सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत अनेक विकासकामे लागली. याचा लाभ शिवसेना उमेदवाराला निश्चित होईल.

z केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही मोदी सरकारला सीआरझेड उठवता आलेला नाही. कन्नमवार नगर सीआरझेडचा प्रश्न तसाच आहे. येथील 864 बाधित कुटुंबे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत तर संक्रमण शिबिरांत अडीच हजार कुटुंबे राहत असून त्यांनाही सरकारने तिष्ठत ठेवल्याने मोदी सरकारविरोधात प्रचंड संताप आहे.

z केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना मुलुंड डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न जैसे थे असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे.

z भाजपचा खासदार असतानाही येथील मुलुंड, घाटकोपर, मानखुर्द आणि शिवाजी नगर या भागांतील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना स्वच्छ, पुरेसे पाणी, सार्वजनिक शौचालय या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहेत.

z मुलुंडमध्ये गौतम नगर, विजय नगर, नाईकवाडी नगरसह डोंगराळ भागात असलेल्या झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे.

मतदारांचे गणित

या लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आहेत. यात सुमारे साडेसात लाख मराठी भाषिक असून 2 लाख 64 हजार मुस्लिम मतदार आहेत. दोन लाख गुजराती-मारवाडी तर उत्तर हिंदुस्थानी आणि इतर भाषिक मतदारांची संख्या पावणेदोन लाखांच्या आसपास आहे.