रावणाचे राज्य घालवून रामराज्य आणायचेच; चाकणमधील सभेत आदित्य ठाकरे यांचा निर्धार

कर्नाटकात रेवण्णा राक्षस तीन हजार महिलांवर अत्याचार करतो. त्यांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. मात्र, भाजप आणि मोदी त्याचा प्रचार करतात. अशांना मते देऊ नका. आपल्याला रावणाचे राज्य घालवून रामराज्य देशात आणायचे आहे. रेवण्णासारखा राक्षस गाडायचा आहे, असा ठाम निर्धार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे. देशातील नेते महाराष्ट्रात येऊन राज्यातील ज्येष्ठ नेते भटकती आत्मा आहेत, असे म्हणतात. हा विचार जनतेने मतदाना दिवशी करायला पाहिजे. महाराष्ट्रातील दोन नेते सत्तामेव नाही तर ‘सत्यमेव जयते’चा लढा देत आहेत. या नेत्यांचा  महाराष्ट्रात येऊन अपमान करता. खरी शिवसेना कोण? खोटी राष्ट्रवादी कोण? हे बाहेरून येणारी लोक आपल्याला शिकवत आहेत. त्या भाजपला धडा शिकवा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी चाकण येथील बाजार समितीच्या मैदानावर शुक्रवारी (दि. 10)  जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, दहा वर्षांत काही अच्छे दिन आले नाहीत. मोदी सरकार गेली दहा वर्षे खोटे बोला पण रेटून बोला हे धोरण राबवीत आहे, तर, जे गद्दार आहेत ते खोटे बोला पण रडून बोला, असे म्हणतात.

या सभेला राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेsसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्पप्रमुख आमदार सचिन अहिर, आमदार संजय जगताप, शशिकांत शिंदे, सहसंपर्पप्रमुख आदित्य शिरोडकर आदी उपस्थित होते.

2014 ला जुमला तर 2024 ला गॅरंटी

भाजपच्या आपण दहा वर्षांत अनेक भुलथापा ऐकल्या. 2014 मध्ये त्यांनी काळे धन परत आणणार, प्रत्येक खात्यात 15 लाख आणणार अशा घोषणा त्यांनी केल्या. मात्र, गद्दारांच्या घरात 50 खोके जातात, पण आपल्या घरात 15 लाख येत नाहीत. दहावर्षे हपुमशाही, तानाशाहीची सत्ता होती. काँग्रेसने 75 वर्षात काय केले, म्हणता मग दहा वर्षात तुम्ही काय केले, याचे उत्तर द्या, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी 2014 ला जुमला तर 2024 ला हीच गॅरंटी देत आहेत, असा हल्लाबोल केला.