मुंबईत दिवसभर पावसाची रिपरिप

फोटो - रुपेश जाधव

बुधवारी रात्री मुसळधार कोसळल्यानंतर  गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरातील परळ, कुलाबा आणि वरळी भागात पहाटे पावसाचा जोर वाढला होता. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरातही पाऊस कोसळत होता. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिह्यांत पुढचे दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विजेचा कडकडाट हे परतीच्या पावसाचे लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस परतीचा नाही. मात्र, ही स्थिती कायम राहाणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, नेऋत्य मोसमी वाऱयांनी परतीचा प्रवास सुरू केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून मंगळवारीच मोसमी वारे परतले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हे वारे एकाच जागेवर होते. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून उत्तर बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबईसोबतच राज्यभरात अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत होता. मात्र, उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.