दापोलीतील उंबर्ले तेरेवायंगणीत बिबट्याचा वावर; परिसरात भीतीचे वातावरण

दापोली दाभोळ मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या उंबर्ले पंचक्रोशीतील तेरेवायंगणी गावाकडे जाणाऱ्या परिसरात आठवड्याभरापासून बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. दिवसाढवळ्या परिसरात संचार करणाऱ्या बिबट्यांमुळे उंबर्ले, नानटे, तेरेवायंगणी येथील लोकांना शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा संचार वाढल्याने वन विभागाने योग्य खबरदारी घेत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

दापोली तालुक्यातील उंबर्लेतील लाटीमाल येथूनच तेरेवायंगणी या गावाकडे जाणारा मार्ग आहे. याच मार्गावरून पन्हाळेकाजी लेण्यांकडे गावराईहून जाण्यासाठीचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर स्थानिकांची वर्दळ असतेच. तसेच अनेक पर्यटकही याच मार्गाने पन्हाळेकाजी लेण्या पाहण्यासाठी जातात. अशा या ठिकाणी बिबट्याचा संचार वाढला आहे. त्यामुळे उंबर्ले गावासह तेरेवायंगणी, नानटे, माथेगुजर , ओळगाव , निगडे ,वळणे या गावातील लोकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.

दापोली दाभोळ रोड लाटीमाळ येथे रस्त्यावर रात्री 8 ते 9 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या सत्य घटनेची वन विभागाने दखल घेऊन बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने भितीच्या छायेखाली वावरणा-या येथील ग्रामस्थांना भयमुक्त करावे.
– शैलेश पांगत, विभाग प्रमुख (जालगाव, ता. दापोली) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)