Nagar News – बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला; वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल

नगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून आज पहाटे पुन्हा दोन तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

हल्ल्यानंतर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे हे शेतात दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. परंतु ते दोघेही थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धिंदळे, वन परिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांसह अधिकारी व कर्मचारी पिंजरे घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आता बिबट्याने माणसांनाही लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. अशीच एक घटना २० सप्टेंबरला शुक्रवारी भल्या सकाळीच अकोला तालुक्याती वीरगावात घडली होती.

अधिक माहिती अशी: सध्या वीरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस आणि मका पीक आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यातच भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा संचार असल्याने बिबट्यांचे रात्री आणि दिवसाही दर्शन होत आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची सकाळी पिकाला पाणी देणे आणि डेअरीला दूध घालण्याची लगबग सुरू असताना वीरगावमध्ये बिबट्याने हल्ला केला आहे.

बछडे चुकल्याने मादीने हल्ला केला असल्याचे समजते. यामध्ये पहिल्यांदा बस्तीराम रामचंद्र गांगड यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. त्यानंतर माधव पोपट देशमुख यांच्यावर हल्ला करून जखमी केले. यातील जखमी गांगड यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविले आहे. तर देशमुख यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.