पक्षांची फोडाफोडी करून गद्दारांनी राज्याची सत्ता हिसकावून घेतली.पण गेल्या अडीच वर्षांमध्ये फक्त सूडबुद्धीचे राजकारण केले. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. विकासाच्या नावाने मात्र अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून भिवंडी ग्रामीणमध्येदेखील कोणत्याही योजना आल्या नाहीत. येथील जनतेला ना शुद्ध पाणी मिळाले ना चांगले रस्ते झाले. मिंधे सरकारने दिलेली आश्वासने गेली कुठे, विकास गेला कुठे? असा सवाल करतानाच भिवंडी ग्रामीणमध्ये परिवर्तन घडणार आणि मिंध्यांना त्यांची जागा दाखवणारच, असा जबरदस्त निर्धार शिवसेना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज केला.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचारासाठी अंबाडी नाका येथे प्रचंड गर्दीची सभा पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तसेच मतदार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आघाडीच्या नेत्यांनी भाजप तसेच मिंधे सरकारची सालटीच काढली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील म्हणाले की, भिवंडी ग्रामीण मतदारसंघात विकासाच्या नावाने या कलंकित सरकारने बट्ट्याबोळ केला असून ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित ठेवले आहे. त्यामुळे येथील त्रस्त असलेली जनता विकासाच्या नावाने बट्ट्याबोळ करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी व्यासपीठावर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख विश्वास थळे, जिल्हा सचिव जय भगत, तालुकाप्रमुख कुंदन पाटील, हनुमान पाटील, प्रकाश भोईर, अनंता शेलार, राजूभाऊ चौधरी, सोन्या पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने, काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील, पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, युवासेना जिल्हा संघटक अँड. अल्पेश भोईर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आत्माराम विशे, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख प्रफुल्ल पाटील, महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे, साईनाथ तारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
आमचे आमदार जनतेला भेटणार
शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी आपल्या भाषणात भिवंडी ग्रामीणमधील विद्यमान आमदाराने जनतेचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत असे सांगितले. या माजी आमदाराचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, विकासाच्या बाबतीत ग्रामीण भागाचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. लोकप्रतिनिधी लोकांनाच भेटत नाहीत. शिवसेनेचे उमेदवार महादेव घाटाळ यांना जनतेने निवडून द्यावे, ते लोकांना भेटून त्यांचे प्रश्न निश्चितपणे सोडवतील असा शब्दच त्यांनी दिला.
35 कोटी गेले कुठे?
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 35 कोटी रुपये आणले असा कांगावा केला जातो. पण भिवंडी-वाडा व भिवंडी-चिंचोटी या रस्त्याची दुरवस्था दिसली का नाही, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्यामुळे आपण जिवंत आहोत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सांगितले. गेली दहा वर्षे विद्यमान आमदाराने फक्त टक्केवारीतून स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले. ग्रामीण भागातील तरुण आजही बेरोजगार असून आरोग्याच्या गंभीर समस्या असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार महादेव घाटाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.