आता महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे करणार का?

चंद्रपूर जिह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राचा 7/12 च अदानींच्या नावे करणार का, असा सवाल मिंधे सरकारला केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सरकारचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे उत्तम उदाहरण असल्याची टीका केली आहे.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर शासन निर्णयाची प्रत शेअर करत सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

शाळांमध्ये अदानीचा फोटो लावण्याची तयारी सुरू

शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी मिंधे सरकारकडून सुरू झाल्याचा टोला टीका विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. मिंधे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेला गुजरातकडे गहाण ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवायची गरज आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे उदाहरण

देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समुहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्योग कमी होते ते आता शाळा देखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार या सरकारने अदानी समूहाकडे दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण सरकारने दिले आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.