आता ईडीचे प्रयोग थांबवा, मिंधे गटाचा भाजपवर संताप

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांवरून महायुतीमधील मिंधे गट आणि भारतीय जनता पक्ष आता समोरासमोर आले आहेत. आता ईडीचे प्रयोग थांबवा असे सांगत मिंधे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे.

गजानन कीर्तिकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ईडीच्या कारवायांबद्दल भाष्य केले. ईडीवाले चौकशी झालेली असतानाही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून अटक होईल असे टेन्शन व्यक्तीच्या डोक्यात निर्माण करतात, असा आरोप करत कीर्तिकर यांनी ईडीच्या कारवायांबद्दल संशय व्यक्त केला आहे.

ईडीबद्दल देशातील जनतेमध्ये मोठय़ा प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. ईडीच्या कारवायांना लोक पंटाळले आहेत. त्यामुळे ईडीच्या कारवाया आता थांबवल्या गेल्या पाहिजेत, असे सांगतानाच, भाजपाला देशात भक्कम पाठिंबा असताना ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही, असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे.