बिहारचे पूर्णियाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना दोन दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमक्यांबाबत आता पप्पू यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या धमक्यांमुळे मला अजिबात त्रास होत नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी फक्त आपले काम करतो आणि कोणाच्या खासगी आयुष्यात लक्ष घालत नाही. मला कोण काय करतं त्याचेही काही पडलेले नाही. मी फक्त देवाला घाबरतो तो आपल्या सर्वांसमोर आहे, असेही ते म्हणाले.
पीटीआय वृतसंस्थेशी बातचीत करताना पप्पू यादव म्हणाले की, जर मी संसदेत आणि त्याच्या बाहेर काही बोलतो, तेव्हा मी जबाबदारीने बोलतो. मला माहित आहे की, आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, देशातील जनता ही प्राथमिकता आहे. संविधान सर्वात आधी आहे, एक व्यक्ती सर्व गोष्टींच्या वर असू शकत नाही. सर्वसामान्यांची सुरक्षा व्हायला हवी. ते कोणालाही मारु शकतात, मात्र, ती लोकं मला खरं बोलण्यापासून आणि आपले काम करण्यापासून रोखू शकत नाही. मला कोणाशीही दुश्मनी करण्यात अजिबात रुची नाही, असेही पप्पू यादव म्हणाले.
पप्पू यादव म्हणाले की, माझे कोणाशी वैयक्तिक वैर नाही. मला सुरुवातीपासूनच धमक्या मिळत आहेत, त्याने मला काही फरक पडत नाही. लोकशाही वाचविण्यासाठी झारखंड आणि महाराष्ट्राला वाचवायला हवे. मी कायम लोकांसोबत राहतो, कोणीही मला कधीही मारु शकतात. जर मी मेलो तर काय होणार? देश मरणार? नाही.
पप्पू यादव म्हणाले की, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणताही जाती, धर्माच्या विचारांवर आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर आघात झाला तर मी खरेच बोलणार. मी कधीही सुरक्षा घेऊन राहत नाही. सुरक्षा देण्याबाबत सरकार ठरवते, मी माझी सुरक्षा हटविण्यासाठी आधीच पत्र लिहीले आहे. मी लोकांमध्ये राहतो. माझी काळजी करु नका, लोकं माझी काळजी घेतील. पप्पू यादव म्हणाले की, माझी चिंता करण्याची गरज तुम्हाला नाही, फक्त या देशाचा कायदा आणि संविधानाची काळजी सरकारने करायला हवी.