जगभरातील घडामोडी

झटका! तीन बँकांचे कर्ज महाग होणार

देशातील तीन बड्या बँका बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि यूको बँक यांनी ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. या बँकांनी एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंटसची वाढ केली आहे. यामुळे कर्जदारांचे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन महाग होणार आहे. तसेच कर्जदारांचा ईएमआयसुद्धा वाढणार आहे. कॅनरा बँकेने 0.05 टक्के एमसीएलआर वाढवले. यामुळे 8.95 टक्क्यांऐवजी आता एमसीएलआर 9 टक्के होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या एमसीएलआरमध्ये 12 ऑगस्टपासून वाढ होणार आहे.

तेल अवीवला जाणारी विमाने रद्द

इराणकडून इस्रायलवर ड्रोन हल्ला होण्याचा धोका असल्याने एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. पुढील घोषणा होईपर्यंत सर्व उड्डाणे बंद असतील असे विमान कंपनीने म्हटले आहे. इराणकडून ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या नागरिकांना अन्न आणि पाण्याचा साठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रुग्णांना अंडरग्राऊंड वॉर्डमध्ये हलवण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

ब्राझीलमध्ये विमान कोसळले, 61 जण ठार

ब्राझीलमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात 61 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साओ पाउलो राज्यातील विन्हेडो शहरात हा अपघात झाला असून विमानातील सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पीएस-व्हीपीबी, एटीआर 72-500 हे विमान साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारुलहोसलाकडे जात होते. या विमानात 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असे एकूण 61 जण होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आले नाही.

यूट्यूबच्या माजी सीईओ सुजैन यांचे निधन

यूट्यूबच्या माजी सीईओ सुजैन वोजश्की (56) यांचे कॅन्सर आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्या कॅन्सर आजाराने ग्रस्त होत्या. सुजैन यांच्या निधनानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक्सवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. सुजैन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाही. सुजैन एक चांगली लीडर आणि मैत्रीण होती, असे म्हटले.

दिल्ली ‘एम्स’चे सर्व्हर डाऊन

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे सर्व्हर डाऊन झाले. यामुळे रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एम्सचे सर्व्हर शनिवारी सकाळीच डाऊन झाले. तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सर्व्हर डाऊन झाल्याने ओपीडी कार्ड बनवण्यात अडचण येत होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना चांगलाच मनस्ताप झाला.

ट्रम्प यांच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी बिलिंग्स लोगान इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली. ट्रम्प हे निवडणूक प्रचारासाठी मोंटानाकडे जात होते. त्या वेळी अचानक प्रायव्हेट जेटच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पायलटने इमर्जन्सी लँडिंग केल्याने एअरपोर्टवर पोलीस व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

महिंद्राची थार रॉक्स 15 ऑगस्टला येतेय!

महिंद्राची नवी थार रॉक्स 15 ऑगस्टला येणार आहे. ऑफ रोडर तीन दरवाजाची थार आधीच बाजारात उपलब्ध असून हे थारचे पाच दरवाजाचे नवे व्हर्जन असणार आहे. थार रॉक्स एकूण सहा व्हेरियंट्समध्ये येईल. एन्ट्री लेवल मॉडलमध्ये केवळ 2.2 लिटर डिझेल इंजिन असेल. तसेच याच्या टॉप व्हेरियंटमध्येही 2.2 लिटरचे डिझेल इंजिन दिले जाणार आहे.