बुमरा नंबर एक

कसोटी क्रमवारीतअव्वलस्थान पटकावणारा पहिला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज

हिंदुस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आयसीसी कसोटी क्रमवारीत ऐतिहासिक झेप घेतलीय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा बुमरा आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान झालाय. कसोटीत गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळविणारा तो हिंदुस्थानचा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय हे विशेष!

जसप्रीत बुमराने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीत 9 विकेटस् घेतल्या होत्या. खेळपट्टी कशीही असली तरी बुमराच्या गोलंदाजीची जादू चालतेच. त्याने मायदेशात आणि परदेशातील खेळपट्टय़ांवरही वर्चस्व गाजवले आहे. 30 वर्षीय बुमराने विशाखापट्टणम कसोटीत वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी नसतानाही 9 फलंदाज बाद करीत हिंदुस्थानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर त्याने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावले. बुमराहने रविचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स आणि पॅगिसो रबाडा यांना मागे टाकत हा पराक्रम केला. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा जसप्रीत बुमरा हा हिंदुस्थानचा चौथा गोलंदाज आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी ही कामगिरी केली होती, मात्र हे सर्व फिरकी गोलंदाज होते. कसोटीच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमरा हा हिंदुस्थानचा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय.

टॉप-10मध्ये तीन हिंदुस्थानी

जसप्रीत बुमराने 11 महिन्यांपासून अव्वल स्थानावर असलेला आपलाच देशसहकारी रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत 15 विकेटस् घेतल्या. अश्विनची 841 गुणांसह तिसऱया स्थानावर घसरण झाली. याचबरोबर रवींद्र जाडेजाचा कसोटी क्रमवारीत टॉप-10 मध्ये असलेला तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज होय. तो 746 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.