>>अनिल हर्डीकर
ज्यांना साक्षात लताबाईंचा आशीर्वाद लाभला त्या सुमन कल्याणपूर. अवीट गोडीची गाणी गाणाऱया या दोघींच्या आवाजातील साधर्म्य अचंबित करणारे. सुमनताईंना मिळालेले यश आणि लताबाईंनी पहिल्या भेटीत दिलेला आशीर्वाद आपोआप उजळून निघतो.
‘दूधभात’ या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून हिंदी चित्रपट निर्माण करायचा ठरला त्याचे नाव होते ‘तन्हाई.’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी गाणी रेकॉर्ड झालेली असावीत म्हणून गाण्यांच्या चाली बसवणे झाले. गाण्यांच्या चाली रागदारीच्या बैठकीने काहीशा शास्त्रीय अंगाच्या असतील तर लताबाई आनंदाने आणि तन्मयतेने रिहर्सल करीत. राम गबाले हे ‘दूधभात’चे दिग्दर्शक होते आणि ‘तन्हाई’चेदेखील दिग्दर्शन करणार होते. रिहर्सल होती माहीमला संगीत दिग्दर्शक महंमद शफी यांच्या घरी. लताबाई ठरल्याप्रमाणे रिहर्सलसाठी आल्या. राम गबाले हजर होते.
रिहर्सल सुरू झाली. शफीभाईंच्या घराचा दरवाजा उघडाच होता. दरवाज्यासमोर जिना होता. एवढय़ात एक अत्यंत साधे, पोक्त दिसणारे मध्यमवयीन गृहस्थ जिन्यातून वर येताना दिसले. त्यांच्यासोबत त्यांची एक मुलगी येत होती. त्या दोघांनी पाहिले की, गाण्याची रिहर्सल चालू दिसतेय तेव्हा व्यत्यय करणे योग्य ठरणार नाही असा विचार करून ते माघारी फिरले. निघताना ते मध्यमवयीन गृहस्थ महंमद शफींना म्हणाले,
“माफ करा. तुम्ही कामात आहात. आम्ही नंतर केव्हातरी येऊ.”
लताबाई म्हणाल्या, “क्या बात है शफीभाई? उन लोगोंको आने दीजिये.”
“फिर आयेंगे कभी, रहने दीजिये.” शफीभाई म्हणाले.
“कुछ कामसे आये होंगे, आने दीजिये.” लताबाई म्हणाल्या.
“कुछ खास काम नहीं. उनकी लडकी का गाना सुनाने आये थे.” शफीभाई म्हणाले.
“बुलाईये उन्हे. हम भी सुनेंगे.” लताबाई म्हणाल्या.
शफीभाईंनी त्या गृहस्थांना हाक मारली. ते गृहस्थ त्यांच्या मुलीबरोबर परत आले. ती मुलगी समोर लताबाईंना पाहून लाजली. लताबाई म्हणाल्या, “लाजू नकोस. गा.” त्यावर ती मुलगी म्हणाली, “मी तुमचंच एक गाणं गाऊन दाखवणार होते. आम्ही पुन्हा येऊ केव्हातरी.”
लताबाई म्हणाल्या, “अगं, लाजून कसं चालेल. पुन्हा कशाला खेप? आल्येस तर गा.”
मग ती मुलगी लताबाईंचे एक गाणे गायली. “छान आहे तुझा आवाज.” लताबाई मनापासून म्हणाल्या. “गाणे शिकल्येस का? शास्त्रीय संगीताचं शिक्षण घे. म्हणजे पाया भक्कम होईल. तुला मग सगळय़ा प्रकारची गाणी गाता येतील. खूप मोठी हो.”
त्या वेळची ती होतकरू मुलगी होती सुमन हेमाडी! सुमन कल्याणपूर!! ज्यांना साक्षात लताबाईंचा आशीर्वाद लाभला त्या सुमन कल्याणपूर. विशेषत हिंदी चित्रपटात त्या जेव्हा गायल्या तेव्हा काही काळ लताबाई महंमद रफी यांच्यासोबत गात नव्हत्या. दशरथ पुजारींसारख्या अनेक मराठी संगीतकारांनी सुमनताईंकडून एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन घेतली. ‘केतकीच्या बनी’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगाची’, ‘जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते’, ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’, ‘पक्षिणी प्रभाती’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’, ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘लिंबलोण उतरू कशी’, ‘अरे संसार संसार’, ‘घाल घाल पिंगा…’ ही गाणी अवीट गोडीची.
‘अजहून आयो बालमा सावन बीता जाये’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत ना मैंने करनी थी’, ‘दिल की किताब कोरी है’, ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’, तर मुकेश यांच्यासोबत ‘मेरा प्यार भी तू है’, ‘ठहर जरा ओ जाने जाँ’, ‘हा मैंने प्यार किया’ अशी अवीट गोडीची गाणी गायली आहेत. त्यांनी एकूण 857 हिंदी चित्रपट गीते गायली. पण त्याशिवाय गुजराती, आसामी, मराठी अशा विविध भाषांमध्ये गायलेल्या गाण्यांची संख्या जवळ जवळ तीन हजारांच्या घरात जाईल.
अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कारासोबत अनेकदा गुजराती चित्रपट गीतांच्या पार्श्वगायनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या दोघींच्या आवाजातील साधर्म्य अचंबित करते. असे असूनसुद्धा सुमनताईंना मिळालेले यश सीमित राहिले. याबद्दल बरीच चर्चा, काही गैरसमज, अफवा, दंतकथा, कारणे रसिक व संगीत दर्दी आपापसात बोलत असतात. सुमनताईंचे यजमान काहीसे ‘पझेसिव्ह’ असल्याने सुमनताईंना जेवढा नावलौकिक प्राप्त व्हायला हवा होता तो मिळाला नाही असाही एक मतप्रवाह आहे. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद. पद्मभूषण सुमनताईंना जे यश मिळाले त्याला लताबाईंनी पहिल्या भेटीत दिलेला आशीर्वाद कारणीभूत होता हे नाकारता येणार नाही.