लष्करी अधिकाऱयाच्या हत्येला जबाबदार अतिरेकी कश्मीरात ठार

लेफ्टनंट उमर फयाझ यांचे 2017 मध्ये झालेले अपहरण आणि हत्येत सहभागी असलेल्या लश्कर ए तोयबाचा बिलाल अहमद भट हा दहशतवादी शोपियां जिह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी मारला गेला.

येथील छोटीगाम गावात एक दहशतवादी लपला असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी पहाटेच या गावाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दले जवळ येताच एका ठिकाणी लपलेल्या या दहशतवाद्याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाला.

बिलाल भटच्या नावावर अनेक हत्या आणि गुन्हे

2 राजपुताना रायफल्सच्या तुकडीतील अधिकारी लेफ्टनंट फयाझ हा 22 वर्षीय अधिकारी मे, 2017 मध्ये चुलतभावाच्या विवाहासाठी रजेवर गावी आला असताना त्याचे अपहरण करून दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येच्या एफआयआरमध्ये भटचे नाव होते. हर्मेन येथे बिलालने परराज्यांतील मजुरांवर भिरकावलेल्या हातबॉम्बच्या स्फोटात दोन मजूर ठार झाले होते. छोटीगाम गावातीलच कश्मिरी पंडित सुनील कुमार भट याच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्यासाठी तो स्थानिक तरुणांना चिथावणी देत असे. त्याने अशा 12 तरुणांना सामील करून घेतले होते.