देशात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात ‘लगीनघाई’; 35 लाख विवाह पार पडणार, 4.25 लाख कोटी खर्चाचा अंदाज

प्रातिनिधिक फोटो

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या सर्वेक्षणाचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, 15 जानेवारी ते 15 जुलैदरम्यान हिंदुस्थानात 42 लाखांहून अधिक विवाह झाले, ज्यावर 5.5 लाख कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.

लवकरच लगीनसराई सुरू होणार आहे. हिंदुस्थानात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत 35 लाख विवाह होणार असून त्यावर  4.25 लाख कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. 2023 मध्ये याच कालावधीत 32 लाख विवाह झाले होते. पीएल कॅपिटल-प्रभुदास लीलाधर यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘बँड बाजा बारात आणि मार्पेटस्’ या नावाचा हा अहवाल आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जुलैच्या अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपात केल्याने सण आणि लग्नाच्या हंगामात मोठय़ा खर्चाला प्रोत्साहन मिळेल.

सोन्याला मागणी

अलीकडेच सोन्याच्या आयात शुल्कात 15 टक्क्यावरून 6 टक्क्यांपर्यंत घट केल्यामुळे देशभरातील सोने खरेदीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः आगामी सण आणि लग्नाच्या हंगामात सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ दिसून येईल. सोन्याचे सांस्पृतिक आणि धार्मिक महत्त्व आणि मौल्यवान गुंतवणुकीचा दर्जा पाहता या कमतरतेमुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, असे अहवालात म्हटले आहे.

डेस्टिनेशन वेडिंगवर लक्ष

हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचे फॅड आले आहे. विदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंगवर लोक भरमसाट खर्च करताना दिसतात. याच धर्तीवर देशातील 25 प्रमुख ठिकाणं लग्नस्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. लग्नस्थळांना ओळख मिळावी, आंतरराष्ट्रीय विवाहसोहळ्यांसाठी देशाचे नाव व्हावे, जेणेकरून विदेशी चलन वाढेल, अशी योजना आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत या ठिकाणांना हायलाईट केले जाईल. विदेशात डेस्टिनेशन वेडिंगवर सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च केले जातात. ती रक्कम देशात परत आणणे हे उद्दिष्ट आहे.