महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला आणि शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक आणि शारीरिक बळ देण्यासाठी अजय खानविलकरांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच आमदार महेश लांडगे यांची अध्यक्षपदी तर संजय मोरे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध पुनर्निवड झाली आहे.
नुकतीच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असलेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेची निवडणूक बिनविरोध पार पडली. गेले अनेक वर्षे महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला बळकटी देणारे आमदार महेश लांडगे अध्यक्षपदी तर संजय मोरे कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. तसेच अजय खानविलकरांचा अनुभव आता राज्य संघटनेलाही लाभणार असून त्यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. तसेच मुंबईचे सर्वात धडाडीचे कार्यकर्ते असलेल्या सुनील शेगडे यांच्याकडे राज्य संघटनेच्या तिजोरीची किल्ली देण्यात आली आहे. मुंबईकर मनोहर पांचाळ (उपाध्यक्ष), मंदार आगवणकर, राम नलावडे, राजेश निकम आणि मदन कडू (सर्व संयोजक सचिव) यांचीही राज्य संघटनेत निवड करण्यात आली आहे.
राज्याच्या शरीरसौष्ठवाला आर्थिक श्रीमंती देणार
हिंदुस्थानातील सर्वात बलशाली राज्य संघटना असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेलाच नव्हे, तर त्या संघटनेशी संलग्न जिल्हा संघटना आणि खेळाडूंना बलशाली नव्हे तर आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत बनवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे नवनियुक्त सरचिटणीस अजय खानविलकर यांनी. पदभार स्वीकारताच खानविलकर यांनी खेळ आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी नवनव्या योजना अमलात आणणार असल्याचे सांगितले. मुंबई जिल्हा संघटनाही अवघ्या हिंदुस्थानात सर्वात बलवान आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्हा संघटना आणि आघाडीच्या शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत करायचे आहे.