आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यात 20 एकर जमीन आणि कोट्यावधींच्या शेअर्सच्या हक्कांवरून वाद पेटला आहे. बहीण भावाच्या वादात आई विजयम्मा यांनी आपल्या मुलीची बाजू घेत तिच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटल आहे. तसेच मुलीच्या समर्थनार्थ त्यांनी खुले पत्र लिहले आहे.
आई विजयम्मा यांनी यासंदर्भात पत्र लिहले असून त्या म्हणाल्या की, ज्या मुलावर अन्याय झाला आहे तिला साथ देणे आई म्हणून माझे कर्तव्य आहे. कुटुंबात सुरू असलेल्या या गोष्टी पाहणे माझ्यासाठी वेदनादायक आहे. जगनच्या यशामध्ये शर्मीलाची सुद्धा मेहनत आहे. एका आईसाठी सर्व मुलं समान आहेत. मात्र एकाच मुलावर होत असलेला अन्याय पाहणे माझ्यासाठी त्रासदायक आहे, असे विजयम्मा यांनी आपल्या पत्रात म्हटल आहे.
जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष YSRCP यांनी विजयम्मा यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केला आहे की, जगन मोहन रेड्डी यांनी कधीही मालमत्ता परत मागितली नाही. तसेच जगनने शर्मिलासोबत आपल्या संपत्तीचे वाटप केले आहे. दिवंगत वडील राजशेखर रेड्डी यांनी यापूर्वीच जगन आणि शर्मिला यांच्याच मालमत्तेचे हस्तांतरण केले होते. जगन यांनी कधीही त्या मालमत्ता परत मागितल्या नाहीत, असा दावा जगम मोहन रेड्डी यांच्या पक्षाने केला आहे. बंगळूरु जवळ असणाऱ्या येलहंका येथील कंपन्यांच्या शेअर्स आणि 20 एकर जमीनीवरून बहीण आणि भावामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे.