लालबागमधून बाप्पावर पुष्पवृष्टीसाठी श्रॉफ बिल्डिंग सज्ज

लालबागमधून होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सगळ्यांचे लक्ष वेधते ते येथील श्रॉफ बिल्डिंगमधून होणारी पृष्पवृष्टी. यंदाच्या वर्षी बाप्पावर पृष्पवृष्टी करण्यासाठी उत्सव समितीने तब्बल एक हजार किलो फुले, 300 किलो झेंडूची फुले आणि गुलाबाच्या पाकळ्या ऑर्डर केल्या आहेत.

लालबागमधील श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांनी पुष्पवृष्टीची परंपरा 1970मध्ये सुरू केली. पुष्पवृष्टीची संकल्पना रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांतून आली. श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीला यंदा 55 वर्षे पूर्ण होत आहेत. पुष्पवृष्टीची परंपरा सुरुवातीला फुलांच्या टोपल्या वापरून सुरू झाली होती आणि त्यानंतर तिच्यात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या वर्षी, भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार असलेल्या ‘कुर्म’ अवताराचा देखावा तयार करण्यात आला असून त्यातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे 150 ते 200 सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपतींचा श्रॉफ बिल्डिंगमध्ये पुष्पवृष्टीने सन्मान केला जातो. हा कार्यक्रम रात्री 2 वाजेपर्यंत चालतो.