सांगलीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा बट्टय़ाबोळ, दोन लाख बहिणींना अद्यापि ‘ओवाळणी’ मिळालीच नाही

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून महिला मतदारांना गाजर दाखवले असले, तरी या योजनेच्या अंमलबजावणीचा जिह्यात बट्टय़ाबोळ झाला आहे. कायम कॅप बंद असते. सांगली जिह्यातील 7 लाख 28 हजार 160 महिलांनी ऍप आणि पोर्टलवर अर्ज केले आहेत. परंतु अद्यापही जिह्यात सुमारे दोन लाखांहून अधिक लाडक्या बहिणी ओवाळणीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील महिलांना महिना 1500 रुपये देऊन त्यांची आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करणाऱया सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजना 28 जून 2024 पासून सुरू केली. प्रारंभी योजनेसाठी मोबाइल ऍपवरून अर्ज मागविण्यात आले होते. जिह्यातील 7 लाख 28 हजार 160 महिलांनी अर्ज भरले. त्यापैकी 7 लाख 10 हजार 772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार 580 महिलांचे अर्ज अंशतः अपात्र ठरले आहेत. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या 923 महिलांचे अर्ज अपात्र झाले. अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान लवकर होत नाही. जुलै आणि ऑगस्टमधील काही महिलांच्या खात्यातही रक्कम वर्ग झाली असली, तरी जिह्यात सुमारे दोन लाखांहून अधिक महिलांना अद्यापि पैसे मिळालेले नाहीत.

अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना अद्यापि सूचनाच नाहीत

यापुढे ऍपवरून अर्ज न भरता थेट अंगणवाडीसेविका अर्ज भरतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत अंगणवाडीसेविकांना अद्यापही कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेचे अनुदान सुरू होण्यापूर्वीच महिलांना इतका त्रास दिला जात असल्याने भविष्यात योजना चालणार की नाही, याबाबत महिलांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने महिलांना दीड हजार रुपयांची लालूच दाखविल्याचा आरोपही महिला करत आहेत. थोडक्यात सांगली जिह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

पोर्टल आणि ऍप कायमच बंद

n अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आतापर्यंत ज्या महिलांनी ऍप व पोर्टलद्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत. त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा मोबाईल संदेश आला, तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूर झाले असून, त्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र, त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या. मात्र, पोर्टल आणि ऍप बंद असल्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढली आहे.