उपोषणाचे हत्यार उपसताच सोनम वांगचूक यांची सुटका, पंतप्रधान मोदी, शहा यांचे भेटण्याचे आश्वासन

Sonam-Wangchuk-ladakh

लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीत धडक देऊन केंद्रातील भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी पदयात्रा काढणाऱया लडाखवासीयांचा आवाज पुन्हा दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलीस कोठडीत उपोषणाचे हत्यार उपसताच वांगचूक आणि इतर 150 आंदोलकांना पोलिसांनी सायंकाळी सोडले. त्यानंतर सर्वांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री आमची भेट घेऊन सर्व म्हणणे ऐपून घेतील असे आश्वासन गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्याचे वांगचूक यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही वांगचूक यांनी केला आहे. शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि 150 जणांना मंगळवारी सोडण्यात आले होते. परंतु, त्यांनी दिल्लीतील मध्य भागाच्या दिशेने पदयात्रा सुरू केल्यामुळे त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वांगचूक यांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडले आहे. वांगचुक यांना बावना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत आणखी काही आंदोलक होते. इतर आंदोलकांना नारेला इंडस्ट्रीयल परिसर, अलीपूर आणि कांझावाला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. वांगचूक यांच्यासह 150 आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री दिल्लीच्या सिंगू बॉर्डवर ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात वांगचूक आणि इतर आंदोलकांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.