Kurla Bus Accident – मी तुम्हाला पाच लाख परत देतो, कुर्ला परिसरातील परिस्थिती सुधारा; मृताच्या मुलाचा टाहो

तुम्ही पाच लाख रुपये मदत करत आहात. मी पाच लाख रुपये तुम्हाला परत देतो. तुम्ही कुर्ला परिसरातील परिस्थिती सुधारा, असा सवाल कुर्ला येथील बस अपघातात मृत पावलेल्या कनिस फातिमा यांच्या मुलाने प्रशासनाला केला आहे. तसेच मृत आईच्या कानातले आणि हातातल चोरल्याचा आरोप करत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा त्याने दावा केला आहे.

कुर्ला येथीस बेस्ट बस अपघातात 63 वर्षीय कनिस फातीमा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुलगा आबिद याने माध्यमांशी संवाद साधताना बेस्ट प्रशासनासह BMC वर गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला की, माझी आई कनिस फातीम या दास रुग्णालयामध्ये कामाला होत्या. अपघात झाला त्यादिवशी त्या 9 वाजता कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. त्यानंतर अर्ध्या तासांनी आम्हाला अपघात झाल्याचा फोन आला. आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधाशोध केली असता बस आणि कारच्या मधोमध आईचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून भाभा हॉस्पिटलमध्ये मृतदेह नेण्यात आला. हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. जेव्हा मी माझ्या आईला पहिल्यांदा पाहिल तेव्हा तिच्या हातातले, कानातले आणि गळ्यात चईन होती. मात्र अर्ध्या तासाने पाहिल्यानंतर गळ्यातील चईन फक्त पोलिसांनी आम्हाला आणून दिली. मात्र हातातले आणि कानातले मिळाले नाही, असा आरोप आबिद याने केला आहे.

हाच अपघात जर सकाळच्या वेळी झाला असता तर याच ठिकाणी अंजूमन स्कूल आहे. त्या शाळेतील मुलांचे काय झाले असते. जो ड्रायव्हर होता तो 1 डिसेंबर पासून जॉईन झाला होता. त्याला तितकी ट्रेनिंग दिली गेली नव्हती. डेपोमधून निघणाऱ्या बसचे वेरिफिकेशन होत नाही का? सर्व इलेक्ट्रिक बस असून बसमध्ये काही तांत्रिक बिगाड असेल तर बसचा सेंसर लगेच इंडिकेट होतो. बस खराब असल्याचे तेव्हा माहित पडले नाही का? ही फक्त एकाची चूक नाही. अपघात झाला त्या मार्गावर एकही स्पीड ब्रेकर नाही. तुम्हाल माहितीये स्टेशनच्या जवळ तुम्ही डेपो बनवला आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. तरिही सुरक्षेची तुम्ही काहीही काळजी घेतली नाही. तुम्हाला नागरिकांच्या सुरक्षेशी काहीही पडलेली नाही का? असा सवाल आबिदने बेस्ट प्रशासनाला केला आहे.

तुम्ही पाच लाख रुपये मदत करत आहात. मी पाच लाख रुपये तुम्हाला परत देतो. तुम्ही कुर्ला येथील परिस्थिती सुधारा. माझा BMC ला प्रश्न आहे, तुमच्या समोर अनधिकृत धंदे सुरू आहेत, पार्किंग सुरू आहे. हे कसे लागतायत. याची कोणालाच माहिती नाही का? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे आबिद याने म्हटले आहे.