‘कोतवाली’च्या ‘डीबी’ची पुन्हा स्थापना

अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेली कोतवाली पोलीस ठाण्याची डीबी (गुन्हे प्रगटीकरण शाखा) बरखास्त करण्यात आली होती. आता पुन्हा नव्या दमाची डीबी स्थापन करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कत्तलखाने, बायोडिझेलचा उद्योग या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डीबी पथकात पोलीस अंमलदार योगेश कवाष्टे, गणेश धोत्रे, दीपक रोहोकले, अमोल गाडे, रिंकू काजळे, सोमनाथ राऊत, सलीम शेख, नितीन शिंदे व अभय कदम यांचा समावेश आहे. डीबीचे प्रमुख म्हणून पोलीस अंमलदार कवाष्टे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

नगर शहरातील मध्यवर्ती भागाच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱया कोतवालीतील डीबी मागील 10 दिवसांपूर्वी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती. या डीबीमध्ये प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्यासह 16 कर्मचाऱयांचा सहभाग होता. कोतवालीच्या डीबी पथकामध्ये दोन गट निर्माण झाले होते. दोन गटांच्या वादात दाखल गुह्याची उकल करण्यात डीबी पथकाला अपयश आले होते. याशिवाय इतर उद्योग करण्यावर या कर्मचाऱयांनी भर दिला होता. यामुळेच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी डीबी बरखास्त केली होती. आता पुन्हा नव्या दमाची डीबी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यावर अवैध धंद्यांवर कारवाईबरोबरच गुह्यांची उकल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.