कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात ‘जय भीम’चा नारा होता. हातात निळे झेंडे घेत तरुणाई जोरदार घोषणाबाजी करीत होती. ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करीत शौर्यदिन शांततेत पार पडला.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात आज उत्साही वातावरण होते. प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गावबैठका घेत सामाजिक सलोखा निर्माण केल्याने मानवंदना देण्यासाठी येणाऱया समाजबांधवांमध्ये मोठी ऊर्जा पाहण्यास मिळाली. आज देशभरातून मोठय़ा प्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता. भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासंघ, दलित पँथर यांसह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात येत असताना, विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गीते या ठिकाणी वाजवण्यात येत होती. नागरिकांना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून रांगेत सोडण्यात येत होते. कडाक्याची थंडी असतानासुद्धा रात्रीपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली होती. भर दुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलिसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी चार बाजूंनी रांगा करून बाहेर पडण्यासाठी पाच रांगा करूनही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. कोरेगाव भीमा येथे रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या गर्दीचा ओघ सोमवारी सकाळपासूनच वाढायला सुरुवात झाली असताना, तरुण कार्यकर्त्यांसह स्त्र्ााr-पुरुषांची लक्षणीय गर्दी झाली होती.
सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा नववर्षाचा संकल्प – प्रकाश आंबेडकर
सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा नववर्षाचा संकल्प आहे तसेच मराठा-ओबीसीमध्ये जी भांडणे लावली गेलीत त्यावर तोडगा निघून महाराष्ट्राची शांतता कशी कायम राहील ही आमची नववर्षाची संकल्पना आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आज म्हणाले.
कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. वंचितच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी, कधी प्रवेश द्यायचा याबाबत आघाडीची सहमती अद्याप व्हायची आहे, असे सांगितले. राज्यातील उद्योगधंदे परराज्यात पळवले जात असल्याच्या मुद्दय़ावरूनही यावेळी माध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारले. त्यावर इंडिया आघाडीत सहभागी झाल्यानंतर आपण देशाच्या विद्यमान पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षांत देशाला कसे खोकले केलेय त्याचा आराखडा मांडणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.