कोकण रेल्वे 18 तास ठप्प तर मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवस ब्लॉक

कोकणासह गोव्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील बोगद्यामध्ये पावसामुळे पाणीच पाणी साचले असून ट्रकवर चिखलाचा खच झाला. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने बुधवारी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ट्रकवरील चिखल अक्षरशः गोण्यांमध्ये भरून मालगाडीच्या सहाय्याने हटवण्याचे काम अविश्रांतपणे सुरू होते. तब्बल 18 तासांनंतर बुधवारी रात्री 8.35च्या सुमारास हे काम पूर्ण झाले व मार्ग खुला झाला. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याचे काम केले जाणार असल्याने तीन दिवस दररोज चार तास वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

 मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या कारवार विभागामधील गोव्याच्या हद्दीतील मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी वाहू लागले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता या मार्गावरील वाहतूक सुरू झाली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा पेडणे बोगद्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहू लागले आणि मार्ग पूर्णपणे ठप्प झाला.

हजारो चाकरमान्यांचे मेगाहाल सुरूच

म्हैसदरा नवीन पुलावर गर्डर बसविला जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून 13 जुलैपर्यंत दररोज सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असा चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार.