… तर सहा तासांच्या आत गुन्हा नोंदवा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सरकारी रुग्णालयांना निर्देश

कोलकात्यात आरजी कार मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय खडबडून जागे झाले असून आरोग्य कर्मचाऱ्यासोबत ऑन डय़ुटी हिंसाचार घडल्यास याप्रकरणी संबंधित सरकारी रुग्णालये तसेच वैद्यकीय संस्थांनी संबंधित आरोपीविरोधात घटना घडल्यापासून सहा तासांच्या आत गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सात हजारांचा जमाव रुग्णालयाची तोडफोड करण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलीस काय करत होते? असा सवाल कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम यांनी केला.

आजपासून 24 तासांचा देशव्यापी संप

कोलकात्यातील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे देशभरातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा, शस्त्रक्रिया सुरू राहणार असून ओपीडी, वैकल्पिक शस्त्रक्रिया, दवाखाने बंद राहणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.

मुंबई, महाराष्ट्रातील आरोग्य सेवा ठप्प

मंगळवारपासून सुरू झालेला ‘मार्ड’चा संप आज चौथ्या दिवशीही सुरू राहिल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा कोलमडली आहे. आज निवासी डॉक्टरांनी आझाद मैदानात तीव्र निदर्शने केली. शासकीय रुग्णालयांत केवळ इमर्जन्सी सेवा सुरू आहेत. यातच आंदोलक आणि मार्डच्या मागण्या केंद्रीय स्तरावरच्या असल्याने पालिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत हात वर केले आहेत.