Kolkata Doctor Rape-Murder Case – उपोषणाला बसलेल्या एका डॉक्टरची तब्येत बिघडली, ICU मध्ये उपचारासाठी दाखल

कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पीडितेला न्याय मिळावा यासाठी ज्युनिअर डॉक्टरांनी आमरण उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दरम्यान, त्यापैकी एका ज्युनिअर डॉक्टरची तब्येत बिघडली आहे. त्यांना गुरुवारी रात्री मेडीकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

अनिकेत महतो असे त्या डॉक्टरचे नाव असून शनिवारी रात्रीपासून ज्युनिअर डॉक्टर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला समर्थन देणारे वरिष्ठ डॉक्टर सुवर्ण गोस्वामी म्हणाले की, अनिकेत महतो यांची तब्येत बिघडली आहे.  त्यांना आर. जी. कर रुग्णालयात नेण्यात आले असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पीडितेला न्याय मिळावा यासाठी मागच्या दोन महिन्यांपासून आर.जी. करमधील डॉक्टर महतो आणि अन्य काही जण आंदोलन करत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सात डॉक्टरांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी चार तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी पाठवले होते.

पत्रकारांशी बोलताना चार सदस्यीय वैद्यकीय पथकाचे सदस्य दीपेंद्र सरकार यांनी माहिती दिली. आम्ही त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आलो आहोत. गुरुवारपर्यंत पाच दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावणं स्वाभाविक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.